'पहलगामच्या सूत्रधारांना शिक्षा हवी'

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 9 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

'पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे सूत्रधार आणि हल्ल्यासाठी अर्थपुरवठा करणाऱ्यांना तातडीने न्यायालयासमोर आणावे; तसेच त्यांना तातडीने शिक्षा सुनावण्यात यावी,' असे आवाहन भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या चार देशांचा समावेश असलेल्या 'क्वॉड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग' अर्थात 'क्वाड' गटाने केले आहे.

या प्रकरणात संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य राष्ट्रांनी सहकार्य करावे, असे आवाहनही 'क्वाड'ने केले आहे. सदस्य चार देशांच्या गटाचे परराष्ट्रमंत्र्यांची भेट वॉशिंग्टन येथे झाली, यावर्षी भारतात होणाऱ्या गटाच्या वार्षिक शिखर परिषदेसाठी अजेंडा निश्चित करण्यावर यावेळी चर्चा झाली. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा 'क्वाड' गटाने निषेध केला आणि दहशतवादाविरोधात एकजुटीने लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. मात्र, संयुक्त निवेदनात परराष्ट्रमंत्र्यांनी मे महिन्यात भारतीय आणि पाकिस्तानी सैन्यांदरम्यान झालेल्या चार दिवसांच्या लष्करी संघर्षाचा उल्लेख केला नाही.

या बैठकीस परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ, ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेनी वाँग आणि जपानचे परराष्ट्रमंत्री टाकेसी इवाया उपस्थित होते. 'आम्ही पीडितांच्या कुटुंबियांप्रती आपल्या तीव्र संवेदना व्यक्त करतो आणि जखमींना बरे होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो,' असे संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

'या अमानुष कृत्याचे सूत्रधार, आयोजक आणि अर्थपुरवठा करणाऱ्यांविरोधात खटला चालवावा, अशी आमची मागणी आहे, संबंधितांनी याबाबत सहकार्य करावे, अशी आम्ही संयुक्त राष्ट्रांच्या सर्व सदस्य राष्ट्रांना वाहन करतो,' असे संयुक्त निवेदनात म्हटले आहे. क्वाडच्या सदस्य देशातील परराष्ट्रमंत्र्यांनी पूर्व चीन समुद्र आणि दक्षिण चीन समुद्रात बीजिंगच्या लष्करी दडपशाहीबाबतही गंभीर चिंता व्यक्त केली.

'अत्यावश्यक खनिजांचा पुरवठा व्हावा'
'क्वाड'चे सदस्य देश चार प्रमुख क्षेत्रांमध्ये एकत्रित काम करण्याची योजना आखत आहेत. सागरी आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक समृद्धी आणि सुरक्षितता, अत्यावश्यक आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान; तसेच मानवी मदत व आपत्कालीन प्रतिसाद या मुख्यांवर एकत्रित काम करण्यावर सहमती दर्शविण्यात आली. या वेळी 'क्वाड क्रिटिकल मिनरल्स इनिशिएटिव्ह'ची घोषणा करण्यात आली आहे. सदस्य देशांना अत्यावश्यक खनिजांचा सतत पुरवठा व्हावा, यासाठी 'क्वाड' देश एकत्रितपणे कार्य करतील आणि खनिजांच्या विविध स्रोतांचा उपयोग करतील, असे ठरविण्यात आले.


OSZAR »